जालना : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. आता वसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, अखेर कोविडनं गाठलंच.. असं सांगत अर्जुन खोतकर यांनी सांगितलं की, ‘लोक संकटात असतांना नेतृत्त्वानं घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळून देखील लोकहिताची कामे करतांना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशीर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे.
सोबतच त्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा शासनाच्या निर्देशानाचे सर्वांनी पालन करावे व सुरक्षित रहावे, असे आवाहन देखील केले आहे.