मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेली ईडीची नोटीस यावरून भाजपावर शिरसंधान साधलं.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भाजपच्या हस्तकांनी या ना त्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या हस्तकांनी मला 22 आमदारांची एकच यादी दाखवली. या आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला.
गेल्या एका वर्षापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकार टिकवू देऊ नका. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची तयारी झाली आहे, असं मला सांगत असून धमकावलं जात आहे. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, असंही मला धमकावलं जात आहे. पण मी त्यांना बधलो नाही. मीही त्यांचा बाप आहे, असं राऊत म्हणाले.