सिंधुदुर्ग : शिवसेनेविरोधात थेटपणे हल्लाबोल करणारे आणि नेहमीच शिवसेनेची कोंडी करू पाहणारे भाजपचे आमदार नीतेश राणे यांना शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी प्रथमच जोरदार उत्तर दिलं आहे. नाईक यांनी लांबलचक प्रसिद्ध पत्रक काढून राणेंच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. स्वत:च्या हॉस्पिटलचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नीतेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी सरकारी आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत, असा घणाघात नाईक यांनी केला आहे.
‘गेले सात ते आठ महिने नीतेश राणे व त्यांचे सहकारी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी करत आहेत. वास्तविक अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यात माझ्यासह इतर सामान्य नागरिक, व्यापारी व उद्योजक आहेत. नितेश राणेंचे अनेक पदाधिकारी, इंजिनिअरिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याच रुग्णालयात उपचार घेतले आहेत, असा दावा नाईक यांनी केला आहे.
शासनाचे पैसे वापरून सुद्धा राणे जिल्हावासीयांना कोविड टेस्ट मोफत देऊ शकलेले नाहीत. त्यातही आर्थिक व्यवहार त्यांनी सुरू ठेवला. त्यांच्या रुग्णालयात किती रुपये दिल्यावर कोविड टेस्ट केली जाते हेही त्यांनी जाहीर करावे,’ असे आव्हानच नाईक यांनी दिले आहे.मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार असताना नारायण राणेंनी जिल्हयातील आरोग्य यंत्रणा न सुधारता स्वत:चे खासगी मेडिकल कॉलेज उभारले. मात्र, करोनाच्या महामारीत हे रुग्णालय रुग्ण सेवेपासून अलिप्त ठेवण्यात आले. ही वस्तुस्थिती नीतेश राणे स्वीकारणार आहेत का?,’ असा प्रश्नही नाईक यांनी केला आहे.
नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी आपल्या पक्षाच्या गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नेहमी भेटत असतात. गोवा राज्याने सिंधुदुर्गातील रुग्णांवर उपचार करणे बंद केले आहे. या रुग्णसेवेसाठी महाराष्ट्र सरकार गोवा सरकारला उपचाराचे पैसे वेळेवेळी देत होते. त्यामुळे नितेश राणेंनी आरोप करण्यापेक्षा गोवा रुग्णालयात सिंधुदुर्गमधील रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी पाठपुरावा करावा, असा सल्लाही नाईक यांनी दिला आहे.
Read Also
पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्याबाबत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णयhttps://t.co/JeRYsOLmNE#PankajaMundhe #VinodTawade #Bjp
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020