गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. सिने सृष्टीपासून ते राजकारणा पर्यंत अनेकांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख देखील या प्रकरणामध्ये करण्यात आला होता त्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे यांनी ही केवळ राजकीय चिखलफेक असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे नाव घेणाऱ्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठी किंमत मोजावी लागेल असा जाहीर इशारा दिला आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असून अस्वस्थ आहेत. वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप केले जात आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मला तर हे संपूर्ण महाराष्ट्राविरोधात कारस्थान असल्याची शंका आहे. यामागील सूत्रधार आम्हाला माहिती आहेत. त्या सगळ्यांना या कारस्थानाची मोठी किंमत मोजावी लागेल असं मी जाहीरपणे सांगतो,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.