शिर्डी : शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली होती. यानंतर मंदिरांमधील पुजारी हे अर्धनग्न अवस्थेत असतात. ते फक्त सोवळे नेसतात, त्यावर कधी कोणत्या भक्ताने आक्षेप घेतला नाही, असे म्हणत माता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला होता.
आता शिवसेनेच्या महिला आघाडीकडून तृप्ती देसाईंना थेट इशारा देण्यात आला असून, शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि तोंडाला काळं फासू, असे म्हटले आहे. शिवसेना महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी हा इशारा दिला आहे.
भक्ताने सभ्य पोषाख घालून यावे, अशा पद्धतीचे बोर्ड संस्थानाकडून लावण्यात आले होते. यावर तृप्ती देसाईंनी आक्षेप घेतला होता. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल त्यांनी केला होता.
आता या वादात शिवसेना महिला आघाडीने उडी घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.