मुंबई – औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. मात्र, या नावबदलासाठी हलचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यावरुन चांगलच राजकारण होत आहे. आता, मनसेनं शिवसेनेला संभाजीनगर नावावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय. औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण करावी. संभाजीनगर हे नामकरण करण्याचा निर्णय कोणाच्याही दबावाला बळी न पडता घ्यावा, असे राजू पाटील यांनी म्हटलंय. तसेच, बाळा नांदगावकर यांनीही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत अब्दुल सत्तार यांच्यासंदर्भातील बातमीचा दाखला दिला आहे. नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही बातमी शेअर केली असून सत्तार बोलतात ते खरंय का? असा प्रश्न केलाय.
उद्धव ठाकरेंनीच मला औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक बातमीचे कात्रण आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शेअर केले आहे. या बातमीसह औरंगाबादच्या नामांतरणावरुन नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. ”संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे, श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे. सेनेला केवळ एवढे विचारावे वाटते की तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे. माननीय बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे.”, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.
संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे, श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे. सेनेला केवळ एवढे विचारावे वाटते की तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे.
माननीय बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे. pic.twitter.com/oI2mxC3W69— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) January 2, 2021