मुंबई : महिलांसाठी विशेष बस सेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यशोमती ठाकूर यांची ही मागणी अवघ्या 3 दिवसात मान्य झाली असून, 21 सप्टेंबरपासून या बस सुरू आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी माहिती दिली की, सोमवारपासून पनवेल, डोंबिवली, विरार या ठिकाणाहून विशेष एसटी बसेस सुरु करण्यात येणार आहे. या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील.
‘महिलांसाठी विशेष बस धावणार’
मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या माझ्या मागणीचा संवेदनशील विचार करून निर्णय घेतल्या बद्दल @CMOMaharashtra@AUThackeray
आणि परिवहन मंत्री @advanilparab यांचे आभार.. @bb_thorat— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 18, 2020
या निर्णयाबद्दल यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. यशोमती ठाकूर यांनी ट्विट केले की, मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या माझ्या मागणीचा संवेदनशील विचार करून निर्णय घेतल्या बद्दल आभार.
दरम्यान, महिलांची ने-आण करण्यासाठी एसटीने त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार पनवेल-मंत्रालय, डोंबिवली-मंत्रालय आणि विरार-मंत्रालय या मार्गावर महिला विशेष बस चालवल्या जाणार आहे.