सोलापूर: सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यात पडळकरांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र गाडीच्या काचेचं नुकसान झालं. या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संध्याकाळी पडळकर सोलापुरातील मड्डी वस्ती भागात घोंगडी बैठक घेण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तीनं पडळकरांच्या गाडीवर दगडानं हल्ला केला. सोलापुरात पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती तसंच त्यांच्या दिल्लीतल्या बैठकीची देखील खिल्ली उडवली होती.
‘गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही’
घोंगडी बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा 4 ते 5 लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. माझं इथं कुणाशीही शत्रुत्व नाही, तरीसुद्धा माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असेल तर माझा आवाज बंद होणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
पडळकरांची शरद पवारांवर टीका
गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.