मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर रात्री उशीरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्यावर 31 मार्चला शस्त्रक्रिया होणार होती, मात्र पोटदुखी वाढल्याने मंगळवारी रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. दरम्यान हा त्रास अधिकच वाढल्याने पवार यांच्यावर रात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहेत.
शरद पवार यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांचे आभार मानले. तसेच, लवकरच शरद पवारांना घरी सोडण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, स्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावरीश शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहेत.