कोरोना पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशउत्सवाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्या संबंधीची एक बैठक आज पार पडली या बैठकीसाठी पुणे महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये गणेश उत्सवासंदर्भात गणेश मंडळांना काही नियमावली घालून देण्याबाबत विचार करण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमावली तयार करण्यात आली असून याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच यंदा गणेशोत्सव साधे पणाने करावा, मिरवणूक करू नहे तसेच आपल्याच गणेश मंडपामध्येच गणेश मूर्तीचं विसर्जन करावे अशा प्रकारचे आवाहन महापौरांनी या वेळी पुण्यातील सर्व गणेश मंडळांना केले.
कोरोनाच्या काळात देखील सर्व गणेश मंडळांनी चांगली कामे केली आहेत आणि आजच्या परिस्थितीच भान या सर्व गणेश मंडळांना असल्यामुळे त्यांनी देखील या परिस्थितीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता कोरोनाकाळात गणेश उत्सवाला पुणेकर कशा प्रकारे प्रतिसाद देणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.