सोलापूर – शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. महेश कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र महाविकास आघाडीत कुरबूर नको म्हणून त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं वृत्त होतं. त्यानंतर लगेचच कोठे यांची हकालपट्टी केल्याची माहिती पुरुषोत्तम बरडे यांनी दिली.
महेश कोठे हे सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक आहेत. कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार नियोजित होता. मात्र महाविकास आघाडी करुन सत्तेत आलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष फोडाफोडी टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्तेत एकत्र असताना मित्रपक्षातील नेते फोडणे हे आघाडीला धोकादायक असल्याचं वरिष्ठांचं म्हणणं आहे. त्याचीच प्रचिती पारनेर नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे समोर आला होता.
अहमदनगरच्या पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. तेव्हादेखील अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते. त्यानंतर महेश कोठेंसारखे सोलापुरातील बडे नेते खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल होणार होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडल्यामुळे, महाविकास आघाडीतील कुरबूर तूर्तास लांबणीवर पडली आहे.