मुंबई : मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणा तपास (NIA) करत आहे. या प्रकरणांशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींची एनआयएकडून सखोल चौकशी सुरु असून, आत्तापर्यंत केलेल्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे आज सकाळी ९. ३० वाजताच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले. तिथे ते जबाब नोंदवत असून, अँटलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसेच वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिलेल्या विशेष अधिकारांबद्दल एनआयएकडून त्यांची चौकशी होणार आहे. तसेच आता NIA कार्यालयात माजी पोलीस निरीक्षक आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा दाखल झाले असून त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे
परमबीर सिंग यांनी, त्यांच्या बदलीनंतर काहीच दिवसांनी, मुख्यमंत्री कार्यालयाला एक पात्र पाठवून, त्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांच्यावर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे, त्यांच्या चौकशीची आणि राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे होऊ लागली होती.
यातच सोमवारी मुंबई हायकोर्टाने ऍड.जयश्री पाटील यांच्या, परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या संबंधित रिट याचिकेवर सुनावणी करताना, अनिल देशमुखांच्या प्राथमिक सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यानंतर काल नैतिक जबाबदारी स्वीकारून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आहे.