मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच त्यांच्याकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली होती. यासंदर्भात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा युपीएला फायदा होईल, असे म्हटले आहे.
शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी, यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, शरद पवार यांनी स्वत: हे वृत्त फेटाळले असून यात तथ्य नसल्याचं म्हटलंय. मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नसल्याचं पंकजा मुंढे यांनी सांगितलं.
शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे अध्यक्ष झाले तरी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप मजबूत आहे, मोदींचं नेतृत्व सक्षम आहे. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा युपीएला निश्चितच फायदा होईल. पवार यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनिअरींगचा ते युपीएला फायदा करुन देऊ शकतात. पण, याची आम्हाला चिंता नाही. कारण, भाजपाला काहीही फरक पडणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.