मुंबई : देश महामारीच्या झळा सोसत असताना, दुसरीकडे आयपीएल सारखी स्पर्धा देशात खेळवली जात आहे. यावरून सध्या देशात वातावरण तापू लागलं आहे. अनेक माध्यमांतून देशातील नागरिक यावरून संताप व्यक्त करताना दिसत असतानाच, तसेच भारतातील महामारीची स्थिती पाहून अनेक परदेशी खेळाडू घरवापसी करताना सध्या दिसत आहेत. यातच आयपीएल मधील एका मोठ्या खेळाडूने वेगळ्या प्रकारे मदत करून, भारताला महामारीच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी योगदान दिले आहे.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियन संघातील जलद गती गोलंदाज पॅट कमिन्सने, सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ही महत्त्वाची मदत केली असून, त्याने तब्ब्ल ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणेजच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. त्याच्या या कृतीचे जगभरातून स्वागत केले जात आहे. मात्र त्याचसोबत कमिन्सने केलेली मदत घेताना मोदी सरकारला ही महामारी देशांतर्गत बाब असल्याचं आठवलं नाही का, असा प्रश्न नेटवर अनेकांनी उपस्थित केला आहे.
याला कारण म्हणेज शेतकरी आंदोलनाच्यावेळी अमेरिकन पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रिटींनी, तसेच भारत सरकारने, शेतकरी आंदोलन हा देशाची अंतर्गत बाब असल्याचं म्हणत परदेशी सेलिब्रिटींनी यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन बोलावं अशी भूमिका स्पष्ट केली होती.
— Pat Cummins (@patcummins30) April 26, 2021
दरम्यान, कमिन्सने यासंदर्भात एक मोठा संदेश लिहिला असून, भारत हा आपला अतिशय आवडता देश आहे. माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना मी या देशात भेटलो. मात्र या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल, असा सरकारचा या स्पर्धेला परवानगी देण्यामागचा दृष्टीकोन असावा. असं त्यानं लिहिलं आहे.
तसेच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेऊन, या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे. तसेच लोकांनी आपल्या भावानांना योग्यपद्धतीने वापरुन, त्याचा कामामध्ये वापर केल्यास बदल नक्की घडेल आणि या परिस्थितीवर मात करणं शक्य होईल असंही कमिन्सने म्हणलं आहे. मी केलेली मदत फार नाहीय असं सांगत, पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अशी मला आशा आहे, असे भावनिक उद्गारही त्याने संदेशात व्यक्त केले आहेत.