नवी दिल्ली : देशात करोना साथीचा फैलाव मोठ्या वेगाने होत आहे. बुधवारी देशात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक ३. १४ लाख रुग्णांची नोंद झाली. जगात कुठल्याही देशात एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामुळे देशात करोना बाधितांची संख्या वाढून १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ एवढी झाली आहे. दरम्यान दिवसभरात २१०४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींचा आकडा वाढून १ लाख ८४ हजार ६५७ एवढा झाला आहे.
यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून, या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची बैठक घेतली. एएनआय न्यूज एजन्सीने पंतप्रधान कार्यालयाचा हवाला देत सांगितले आहे की, या उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या काही आठवड्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
PM was informed that exercise is being done in coordination with states to identify their demand for O2 & ensure adequate supply. Against present demand from 20 states of 6,785 MT/day of Liquid Medical Oxygen, GoI, from April 21, has allocated 6,822 MT/day to these states: PMO
— ANI (@ANI) April 22, 2021
दरम्यान, या बैठकीत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितले की, ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि त्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी, राज्य सरकारांसोबत समन्वय साधला जात आहे. सध्यस्थितीत भारतातील २० राज्यांना दररोज ६,७८५ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता आहे, या मागणीनुसार २१ एप्रिलपासून या राज्यांना दररोज ६,८८२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि अखंडित करावा याची काळजी घ्यावी.
तसेच, या उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांची त्रिसूत्री अधिकाऱ्यांना सांगितली. यातील पहिला उपाय म्हणजे ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात, दुसरा उपाय ऑक्सिजन वितरणाची गती वाढवण्याचा आणि तिसरा म्हणजे आरोग्य सुविधांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांचा वेगवान पद्धतीने वापर करणे.