पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येणारे ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये एका रुग्णाला मोफत ‘आयसीयू’ बेड उपलब्ध करुन देण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल १ लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड आणि नगरसेवक विकास डोळस यांनी उघडकीस आणल्यानंतर, हे प्रकरण चांगेलच जोर धरू लागले आहे. त्यातच यात स्पर्श हॉस्पिटल तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एका नगरसेविकाचा देखील हात असल्याचे बोलले जात असल्याने, “ती” नगरसेविका कोण हे देखील गूढ वाढू लागले आहे.
दरम्यान, या विषयाच्या अनुषंगाने आज पत्रकारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना, अतिरिक्त आयुक्तांनी या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अशा गैरप्रकारात नाव आलेल्या त्या नगरसेविकेवर पक्षाकडून काही कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला असता, उत्तरादाखल त्यांनी, “सध्या जिल्ह्यातील आणि राज्यातील परिस्थितीकडे आपण प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे”, असे सांगत या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या “त्या” नगरसेविकेची पक्षाकडून एकप्रकारे पाठराखण केली जात आहे काय, असा सवाल आता उठू लागला आहे. दरम्यान, या गैरप्रकारामध्ये चिंचवड विधानसभेतील भाजपच्या एका ‘स्मार्ट’ नगरसेवकाचा देखील हात असल्याचे देखील बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील “ती” नगरसेविका आणि या ‘स्मार्ट’ नगरसेवकाचा ‘स्पर्श’ संस्थेला सपोर्ट आहे. विशेष म्हणजे, या वादग्रस्त संस्थेत अप्रत्यक्षपणे संबंधितांची भागीदारी असल्याचीसुद्धा चर्चा आहे.