मुंबई – ‘ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे, कदाचित उद्या त्यांचा पक्षप्रवेश होईल’, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हाती घेणार अशी चर्चा होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या या विधानानंतर अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
राऊत म्हणाले की, ‘ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल’.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मध्य मुंबईतून तिने लोकसभा लढवली. मात्र तिचा पराभव झाला होता. त्यानंतर मुंबई काँग्रेसमधील हेव्यादाव्यास वैतागून तिने सहा महिन्यांत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त म्हणून ऊर्मिलाची शिवसेनेने मागच्या महिन्यात शिफारस केली आहे. मात्र, राज्यपाल यांनी अद्याप या यादीस संमती दिलेली नाही. तत्पूर्वी ऊर्मिलाने शिवसेनेचा भगवा हाती घेण्यास होकार दिला आहे.