यावर्षी आयपीएलचा 13वा हंगाम यूएईमध्ये होणार आहे. सरकारकडून परदेशात आयपीएलच्या आयोजनासाठी अधिकृत परवानगी देखील मिळाली असून, 20 ऑगस्टनंतर सर्व संघ यूएईला रवाना होणार आहेत. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात आदित्य ठाकरे खेळणार आहेत.
आश्चर्यचकित होऊ नका, कारण हे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नसून, त्यांच्या नावाशी साम्य असलेला हा विदर्भाचा युवा क्रिकेटपटू आहे. ‘आयपीएल’साठी किती खेळाडू यूएईला न्यायचे, यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण यूएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सरावासाठी विविधता असलेले गोलंदाज आवश्यक आहेत. ही गरज ओळखून ‘आरसीबी’ संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे.
2018 मध्ये झालेल्या 18 वर्षांखालील संघाच्या वर्ल्ड कपमध्ये आदित्यने चांगली कामगिरी केली होती. स्थानिक क्रिकेटमधील त्याची कामगिरी चांगली असल्याने, त्याला आरसीबीच्या संघात घेण्यात आले आहे. आदित्यला फक्त फलंदाजांना सराव देण्यासाठी आरसीबी संघाबरोबर युएईला नेणार आहेत. पुढे जाऊन त्याची संघात निवड देखील केली जावू शकते.