मुंबई : सीरम इंस्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी धमकावलं जात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. पुनावालांच्या या गौप्यस्फोटानंतर आता राज्यातील राजकारण देखील तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
केंद्र सरकारचे लसीकरणाचं नियोजन बिघडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मोठी चपराक दिली आहे. सामुहिक जबाबदारीने संकटावर मात करण्याची तयारी न दाखवता फक्त घोषणा केली जाते. नागपुरात कोरोनाचे 5 स्ट्रेन पाहायला मिळाले आहेत. अदर पुनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करतानाच आशिष शेलार यांनी अदर पूनावाला यांना कुणी धमकावलं याचा भांडाफोड करावाच, असे आवाहन देखील वडेट्टीवार यांनी केले आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी पुनावाला यांना धमकवण्यामागे जो पक्ष त्याला उघडं करणार असल्याचे म्हटले होते. माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही. ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं, आमच्याकडे माहिती येत आहे, असा इशारा शेलार यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांना शेलारांना त्या पक्षाचे नाव सांगावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला. बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी पाटलांना लगावला आहे.