मुंबई – काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ शेवटी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले. मात्र, त्यानंतर आता पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाची जागा घेण्यासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत त्यासाठी लॉबिंग सुरु झाली आहे.
‘एक व्यक्ती एक पद’चा पुरस्कार करुन नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची मागणी राज्यातील काही नेत्यांनी केली. नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी केंद्रीय पातळीवर तयारीही सुरु झाली. त्यांनतर विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. ही निवड झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.
मात्र, नाना पटोलेंची जागा घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चुरस सुरु आहे. त्यासाठी आपापल्या पातलीवर लॉबिंगही सुरु झालं आहे. मराठवाड्यातील आमदार सुरेश वरपुडकर यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत असे अनेक नेते विधानसभा अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय डावपेचात अनुभवी म्हणून ओळखले जाणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी झाली होती. मात्र, त्यांच्या नावाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध झाला. त्यामुळे त्यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची मिळू शकली नाही. भविष्यात पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आल्यांनंतर ही खुर्ची पुन्हा खाली होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
तसेच, सुरेश वडपुरकर हे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या पदासाठी त्यांच्याही नावाची सध्या चर्चा सुरु आहे. या दोन्ही नावांसोबतच आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचेसुद्धा नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.