राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा दौऱ्यावर असताना गरजूंना कोरोनाच्या आजारातून वाचविण्यासाठी 175 रेमडेसिवीर इंजेक्शन्स जिल्हा रुग्णालयाला दिली होती. यातील काही इंजेक्शन गायब झाल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातून गायब झाल्याचा आरोप सातारा राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी या इंजेक्शन्सच्या वापराबाबत तपशिलाची विचारणा केली असता, ती गायब झाल्याचे उघडकीस आले. राष्ट्रवादीकडून चौकशीसाठी राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकारी यांना या बाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे.
डॉ. सुभाष चव्हाण यांनी ही इंजेक्शन गहाळ झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे. इंजेक्शन्स चोरून इतरत्र विकली गेल्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली.