IMPIMP

मुंबईतील जमाव बंदीबाबत आदित्य ठाकरे म्हणतात…

 

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. लॉकडाऊनमध्ये आलेल्या शिथिलतेचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं प्रशासनानं पुन्हा एकदा संसर्ग रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन केलं आहे. ‘घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. मुंबई पोलिसांनी केवळ ३१ ऑगस्टच्या निर्णयाची मुदत आणखी वाढवली आहे. मुंबईकरांवर कुठलेही नवे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. सर्वांनी आपल्या संपर्कातील लोकांना या वस्तुस्थितीच माहिती द्यावी,’ असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू राहणार असून या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांच्या या आदेशामुळं मुंबई पुन्हा लॉकडाऊन लागल्याची चर्चा सुरू झाली होती. व्हॉट्सअॅपवरून विविध संदेश फिरवले जात होते. गावखेड्यापर्यंत या मेसेज पोहोचले आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.