शिर्डी : शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांनी एकत्र स्नेहभोजन देखील केले. या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.
श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.
अब्दुल सत्तार म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावे. विखे पाटील राज्याचे अनुभवी नेतृत्त्व आहे. विखे पाटलांच्या नेतृत्त्वाची राज्याला गरज आहे, तर दुसरीकडे विखे पाटील यांनी ही कोणतीही राजकीय भेट नसल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीपुर्वी दोन्ही नेते काँग्रेसमध्ये होते. मात्र नंतर त्यांनी पक्षांतर केले. आता सत्तार यांनी विखे पाटलांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्यानंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.