अमरावती : सामान्य कुटुंबातुन येऊन वनपरिक्षेत्र अधिकारी झालेल्या २८ वर्षीय दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. आज या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये, दीपाली यांचा गर्भपात केल्या प्रकरणी विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपाली चव्हाण या अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) म्हणून कार्यरत होत्या. इथे त्यांचे वरिष्ठ डीएफओ शिवकुमार अगदी लहान गोष्टींवरून दिपाली चव्हाण यांना त्रास देत हाेते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक आणि आर्थिक छळ, अंतर्गत तक्रार समित्यांचा अभाव, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यानं प्रचंड नैराश्यातून वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी, २५ मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती.
या प्रकरणात वरीष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्यावर दीपालीने मृत्यपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप करत आत्महत्येला जबाबदार म्हटले होते. त्यामुळे २५ मार्च रोजीच डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा 306 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, धारणी पोलिसांनी अधीक वेगाने तपास करत, शिवकुमार याने दीपालीला जंगलात फिरवल्याने तिचा गर्भपात झाला, असं पोलीस तपासात निष्पन्न केले आहे. त्यामुळे शिवकुमार यांच्या गुन्हात वाढ करून ३१२, ५०४, ५०६ चे गुन्हे आणखी दाखल करण्यात आले आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत माझा गर्भपात झाला होता, असं म्हटलं होतं. त्यामुळे त्या दृष्टीने देखील धारणी पोलिसांनी तपास करत गुन्ह्यात वाढ केली आहे.
सध्या सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ९ सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, अशी मागणी सरकारकडे केली आहे .