मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरात सिटी सेटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली आग ३५ तासांनंतरही अद्याप धुसमत आहे. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तब्बल 35 तासांनंतरही आग धुमसतच असून, आतापर्यंत या प्रयत्नात अग्निशमन दलाचे 5 जवान जखमी झाले आहेत.
सिटी सेंटर मॉलमध्ये आगीची घटना घडली होती, सदर घटनास्थळी नुकतीच भेट दिली. या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केले. pic.twitter.com/A9BvtnzpPk
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 23, 2020
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केले, असे ट्विट करत ते म्हणाले.
दरम्यान, सध्या या ठिकाणी १४ पाईपलाईनच्या मदतीने आणि दोन मोठ्या शिडीच्या सहाय्याने मॉलच्या बाहेरुन सातत्याने पाण्याचा मारा सुरु आहे. मात्र मॉलमध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि दुकानातील लाकडी फर्निचर यामुळे ही आग अजूनही धुमसत आहे. आग लागल्यानंतर मॉलच्या दुसऱ्या-तिसऱ्यामजल्यावरील एकामागून एक दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडत होती. सिटी सेंटर मॉलजवळच ‘ऑर्किड एन्क्लेव्ह’ ही 55 मजली इमारत आहे. या इमारतीमधील 3500 रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.