मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र या सगळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार हे मुंबईत नसल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला हजर राहू शकले नाहीत.अजित पवार हे आज-उद्या बारामतीतच असतील उद्या म्हणजे रविवारी 24 तारखेला सुपेगावात एका कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत.
बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.