नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. राज्यात अजित पवार आणि शरद पवार गट पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यातच नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपली भुमिका जाहीर केली असून त्यांनी आज अजित पवार गटात सहभागी झाल्याचं सांगितलं. यातच आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अजित पवार नाशिक येथे आले असता त्यांनी अजित पवार यांचं जोरदार स्वागत करत अजित पवार गटाला आपला पाठिंबा जाहिर केला.
सरोज अहिरे म्हणाल्या की, माझी तब्येत खराब होती,मात्र आता बंर वाटतं आहे. मी अजित पवारांच्या स्वागतासाठी बाहेर पडले आहे. याचा अर्थ असाच आहे की, मी माझ्या देवळाली मतदारसंघाच्या वतीने अजित पवारांना पाठिंबा जाहीर करत आहे. रूग्णालायत असताना माझी फोनद्वारे सर्वांशी चर्चा झाली आहे. सगळ्याचं एकच मत होत आणि ते म्हणजे आपण विकासाबरोबर जायला हवं.
दरम्यान, देवळाली मतदारसंघाचा पुर्ण विकास करण्यासाठी सत्तेबरोबर जा, असा सर्वांचा आग्रह होता. एकलहरा प्रकल्पासह इतर जनतेचे प्रश्न आणि राहिलेली कामं पुढील एक ते दीड वर्षात करण्यासाठी सत्तेबरोबर, अजित पवारांसोबत राहा हा जनतेचा आग्रह आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.