मुंबई : राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड भार पडत असून, परिणामी रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर आणि इतर औषधांसाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच राज्यात करोना साथीने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत असून, दुसरीकडे ऑक्सिजन अभावी देखील अनेक करोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
दरम्यान, राज्यातल्या करोना परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यातच शनिवारी ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि काही नेते, हे विलेपार्लेच्या बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. यावरून सध्या देवेंद्र फडणवीसांवर चारही बाजूंनी टीकेचा भडीमार होत आहे.
यातच आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी देखील उडी घेतली असून, त्यांनी ट्विट करत, माणसा माणसात देखील किती फरक असतो. एक माणूस आपल्या जीवाची बाजी लावून एका मुलाचा जीव वाचवत आहे. तर एक नॉटी जमात आहे, जी लोकांचे प्राण वाचवणाऱ्यांचे प्राण घेण्यासाठी, सत्याला खोटे सिद्ध करण्यासाठी व्यस्त आहे, असं म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
त्यांच्या या ट्विटसोबत त्यांनी, मुंबईमधील वांगणी रेल्वे स्थानकावर कामावर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचारी मयुर शेळके यांनी एका अंध महिलेच्या मुलाचा जीव वाचवल्याचा एक व्हिडिओ जोडला असून, एकीकडे मयुर शेळकेचे कौतुक करताना दुसरीकडे त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
इंसान इंसान की फ़ितरत में ही कितना अंतर दिखता है- एक इंसान है जो अपनी जान पे खेलकर दूसरे की जान बचाता है और एक #naughty जमात है जो जान बचाने की कोशिश करने वालो की ही जान लेने के लिए सच को झूठ साबित करने मे व्यस्त है ! #Maharashtra #BJPSavingMaharashtra #DevendraSavingMaharashtra https://t.co/iMHHrybiAJ
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 19, 2021