पुणे : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीचे अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी सकाळी याबाबतची माहिती दिली असून लाड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपने या ठिकाणी सांगलीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी संघर्ष पाहायला मिळाला. या जागेसाठी लाड यांच्यासह सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे इच्छूक होते. कोकाटे यांनी प्रचाराला सुरुवात केली तर पाटील यांनी उपमुख्ममंत्री अजित पवार यांच्याकडे ठाण मांडले होते. दुसरीकडे लाड समर्थकांनी उमेदवारी अरुण लाड यांनाच मिळेल असा दावा आठ दिवसांपूर्वीच केला होता.