पुणे : कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं. यातच कोणी उमेदवारी मिळालं नाही म्हणून नाराज आहे. कोणीही उमेदवारावर नाराज आहे. तर कोणी मानपानावरून नाराज आहे. त्यामुळे पुणे काँग्रेसमध्ये रोज नवीन एक नाराजी नाट्याचे रोज नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत.
उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावांतांना डावलत असल्याचं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी काँग्रेस भवन येथे आंदोलन केल्याचं सर्वांनीच पाहिलं. केसरी वाड्यात पार पडलेल्या बैठकीत देखील नाराजी नाट्य सुरूच राहिलेले दिसून आले. त्यानंतर आता माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीसाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर “नेत्याचा” फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
कॅन्टोन्मेंट भागामध्ये शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर काँग्रेसचे एक नेते आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो नव्हता. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी फ्लेक्सवर फोटो नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर मेळावा सुरू होण्यापूर्वीच संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी मंडपवाल्याला जाब विचारला. त्याला मारहाण केल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरु असून या सर्व घटनांमुळे रवींद्र धंगेकर यांची मात्र निश्चितच डोकेदुखी वाढणार आहे.