मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा, अशा शब्दात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
आशिष शेलारांनी केलेलं फडणवीसांचं हे कौतुक म्हणजे राज्याच्या आगामी राजकारणातील उलथापालथीचं भाकीत असल्याचीच चर्चा आता राजकीय विश्वात रंगत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शेलार बोलत होते
प्रवीण दरेकर यांच्या लेखाजोखा या पुस्तकाचं प्रकाशन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. जो जनतेची काम करतो तोच जनतेसमोर त्या कामाची ठासून मांडणी करु शकतो, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांचंही कौतुक केलं. प्रवीण दरेकर यांनी जास्त वेळ विरोधी पक्षनेते राहू नये एवढीच इच्छा असल्याचंही शेलास म्हणाले.
याच कार्यक्रमात बोलताना प्रवीण दरेकर यांनीही फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली. देवेंद्र फडणवीस हे अजूनही वस्तादच आहेत. ते आजही सगळ्यांशी एकटेच लढत आहेत, अशा शब्दात दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. ज्या झाडाला फळ त्यालाच दगड मारतात, जिथे फळ नाही तिथे कोणी जात नाही, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना कधीच काही नाही मागितलं नाही. न सांगता न मागता मला आमदार केलं आणि तसंच विरोधी पक्षनेता ही बनवलं त्यांनी मला जबाबदारी दिली. मी माझ्या नेत्याला पक्षाला आणि जनतेला उत्तर द्यायला जबाबदार आहे, असंही दरेकर म्हणाले. ज्यावेळी जंगलात वादळ आल होत तेव्हा जंगलातले वाघ बिळात बसले होते, तेव्हा प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस सगळीकडे वादळाचा सामना करत फिरत होते, असा टोला दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.
प्रविण दरेकर यांच्या कारकिर्दीच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ पुस्तकाचं प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची उपस्थिती होती.
Read Also
सीमाभाग प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ निर्णय
भाजपाला महाराष्ट्रातील राजकारणात लोणच्या एवढे स्थान देखील उरणार नाही , जनता भाजपला हद्दपार करेल