“शिवसेनेने आंदोलन जरुर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही, याचं उत्तर द्यावं” अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. “वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का?” असा सवाल राऊतांनी विचारला होता. यावर आशिष शेलार यांनी राऊतांना उत्तर दिले.
भाजप नेते आशिष शेलार यांनी व्हिडिओ ट्वीट करत संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “कर्नाटकातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला, याचा आम्ही निषेधच करतो. या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या देशामध्ये, अखंड हिंदुस्तानामध्ये कधीही कोणी करता कामा नये, तो आम्ही होऊही देणार नाही. या सगळ्या मागे स्थानिक कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका ही थेट आहे, पुतळा हटवण्याची आहे. कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या जारकीहोळी यांच्याविरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का? हा सवाल आमचा तुम्हाला आहे.” असे शेलार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे!
पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का? pic.twitter.com/aaXjePCGKV— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2020