मुंबई : “खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे.
थोरात म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे, असे खोटे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी नाही. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. मात्र फडणवीस यांना काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे असा साक्षात्कार झाला व त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसवर आरोप करण्याचा नादात आपण खोटे बोलत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याच्या अगोदर त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते असे थोरात म्हणाले.
काँग्रेस पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशप्रेम हे काँग्रेसच्या नसानसात आहे. स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये.