मुंबई : “अँटिलीया” स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणांचा तपास एनआयए करत असून, आत्तापर्यंत यात एनआयएकडून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सध्या “अँटिलीया” बाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयए, मुख्य संशयित आरोपी सचिन वाझे यांची सखोल चौकशी करत आहे, त्यातच कोठडी वाढवून मिळाल्याने या प्रकरणातील गुंता सुटून, लवकरच या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत जात आहेत याचा शोध लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस असल्याचा दावा वाझे यांच्या वकिलांनी केला आहे. वाझे यांचे वकील रौनक नाईक यांनी एनआयएच्या विशेष कोर्टाकडे, वाझे यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठीचा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, एनआयए कोर्टानंही सचिन वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे.
दुसरीकडे वाझेंच्या एनआयए कोठडीची मुदत शनिवारी संपत आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा वाझे यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावेळी वाझे यांचे वकील रौनक नाईक यांनी कोर्टाला एक पत्र लिहून त्यात, सचिन वाझे यांना छातीत दुखण्याचा त्रास असून, त्यांच्या हृदयात ९० टक्क्यांचे दोन ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे वाझे यांना कार्डियोलॉजिस्टकडून उपचार घेऊ दिले जावेत, अशी मागणी केली आहे.
मुंबईत २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या “अँटिलिया” बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली एक बेवारस स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्यातून २० जिलेटिनच्या कांड्या आणि एक पत्र जप्त करण्यात आलं होतं. नंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा शोध घेऊन, त्य्नाच्या पोलीस चौकशी दरम्यान, मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या रेतीबंदर परिसरात आढळला होता.
प्राथमिक तपासात हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. पण हिरेन यांच्या पत्नीनं मनसुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. त्यानंतर एनआयएच्या तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि १३ मार्च रोजी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी वाझे यांचा हात असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे.