नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढवण्यासाठी लवकरच भाजपवासी होणार असलेले बाळासाहेब सानप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले बाळासाहेब सानप हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी सानप यांना पक्षप्रवेश देत त्यांच्याकडे मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे.