पुणे : भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांची ड्यूटीच आहे, मात्र इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही, त्यांना लगेच टोचते, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईतील पत्रकारपरिषदेत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपवर टीका करणं,ही संजय राऊत यांची ड्युटी आहे आणि ते आपली ड्युटी योग्यपणे पार पडत आहेत.मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही,त्यांना लगेच टोचतं ! तसेच शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात,हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे.. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं. pic.twitter.com/DQA9FJTZfB
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 31, 2020
पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांचं हिंदुत्व वेगळंच आहे. कारण, त्यांच्या सोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसने सावरकरांना समलिंगी संभोगी म्हटले. तरी देखील आपण ऐकलंच नाही, असं दाखवून कानात बोळे घालून बसणं हे त्यांचं हिंदुत्व आहे. आम्ही छातीठोकपणे सांगतो की, आम्ही घटनेतील जो सर्वधर्म समभाव आहे तो मानतो. पण त्यात जर हिंदुंवर अन्याय म्हणजे जर सर्वधर्म समभाव असेल, तर आम्हाला मान्य नाही, तो त्यांना मान्य आहे.
शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे. आम्हाला काय त्यांनी पार्थ पवारांचाही सल्ला घ्यावा, म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं, असा सणसणीत टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.