मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस बजावली आहे . त्यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापा टाकून सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरुन महाविकासघडीतील नेते भाजपवर चांगलेच संतापले होते. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस बजावली होती.
महाविकासआघाडीतील नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली जात असल्याचा आरोप होत आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की कोणती चौकशी कोण, कुठे कशी लावत आहे, ते काही कळत नाही. एक मात्र खरे की सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली आहे. आज ना उद्या चौकशी होणारच. त्यामुळे त्याचाही सामना संपूर्ण ताकदीनिशी करण्यात येईल