आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी पक्षीय संघटनेत एकवाक्यता आणण्यासाठी तसेच नियोजनबद्ध कार्यकम राबवण्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा प्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचे खासदार असणाऱ्या मतदारसंघात देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपकडून ‘मिशन ४५ +’ चा नारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये विरोधी पक्षांची महाविकास आघाडीच्या माध्यमातून असणारी वज्रमूठ पाहता भाजपला बरेच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीला १० महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच केंद्रीय स्तरावरून रणनीती आखण्यात येत आहे. मतदारसंघात पक्षातील नेते, वेगवेगळे सेल तसेच राज्य स्तरावर समन्वय ठेवण्यासाठी लोकसभा प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात आमदार राहुल कुल, शिरूरमध्ये आमदार महेश लांडगे यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पुणे लोकसभा मतदारसंघात संघटन महामंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवड करण्यात आली आहे.