मुंबई : भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीजबिलांबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे.
दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजप वीजबिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे.