मुंबई :: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेयांनी ब्राह्णम समाजासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेण्याची मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. खडसेंनी विधान मागे घेतले नाही तर पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला आहे.
ब्राह्मणाला मी मुख्यमंत्रीपदाचं दान दिले, असे खडसे यांनी म्हटले होते. यानंतर ब्राह्मण महासंघ प्रचंड आक्रमक झाला होता. दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी. याचे ज्ञान खडसे यांना नसावे याचे आश्चर्य वाटतं. खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल, असे आनंद दवे यांनी म्हटले होते.
यासंदर्भात आज ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आमदारांना निवेदनही देण्यात येणार आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.