पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी रुपाली पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील एका अज्ञात व्यक्तीने फोनवरुन पाटील यांना धमकी दिली आहे.
धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी त्यांना दिली. धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मनसेकडून अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या रविवारपासून पुन्हा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरविण्याची मागणी त्यांनी केली आहे.