IMPIMP

८ ते १० जागांवर उमेदवारी चुकली, महायुतीत धाकधूक वाढली, निकालाकडे लक्ष

मुंबई : राज्यात २०२२ साली शिवसेनेत तर २०२३ साली राष्ट्रवादी पक्षात फुट पडली. यासाठी अनेकांनी आपला मुळ पक्ष सोडला तर अनेक जण त्याच पक्षात राहिले. त्यानंतर राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लोकसभेची निवडणुक झाली. एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तर दुसऱ्या बाजूला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस आमनेसामने होते. मात्र यामध्ये महायुतीकडून काही मतदारसंघात उमेदवारी चुकल्याचं दिसून आलं आहे. याचा मोठा फटका महायुतीला बसणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

देशात भाजपने ‘चारसे पार चा नारा’ दिला अन् त्यासाठी राज्यात महायुतीच्या नेत्यांनी कामाला सुरूवात केली. परंतु लोकसभेच्या ४८ जागांवरून महायुतीत मोठा गोंधळ बघायला मिळाला. काही मतदारसंघासाठी तर अखेरच्या दिवशी उमेदवार जाहीर करावा लागला. आता येत्या ०४ जूनच्या निकालाची सगळेच जण वाट पाहू लागले आहेत. परंतु त्याआधी संभाव्य निकालाची चर्चा राज्यात सुरू झालीय.

पक्ष फुट, अन् त्यानंतर राज्यात झालेले बदल यामुळे सामान्य मतदारांमध्ये ज्यांच्याबद्दल नाराजी आहे, अशा विद्यमान खासदारांना तिकीट दिल्याचा फटका विशेषत विदर्भात बसू शकतो असे म्हटले जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला लोकांनी मोदींकडे पाहून मते दिलीत असा दावाही अनेक नेते करतांना दिसताहेत.

महायुतीच्या उमेदवारांना नाराजीचा फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. बुलढाण्यात अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर किती आणि कोणती मते घेतात, यावर शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांचं भवितव्य आहे. दक्षिण मुंबईत भाजपने शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या ऐवजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, किंवा मंगलप्रभात लोढा यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली असती तर विजय मिळाला असता. असा तर्क लावला जात आहे. तसंही यामिनी जाधवांना प्रचारासाठीही कमी वेळ मिळाला.

पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मराठा-मुस्लिम-दलित असे समीकरण महाविकास आघाडीसोबत होते तर विदर्भात कुणबी-मुस्लिम-दलित समीकरणाने आमचा फायदा होईल अस महाविकास आघाडी चे नेते सांगताहेत. तर दुसऱ्या बाजूला मराठा आणि कुणबी समाज आमच्यासोबतही होता असा दावा भाजपचे नेते करतांना दिसत आहेत.

अमरावतीत नवनीत राणा अन् भाजपचे सुर शेवटपर्यंत जुळलेच नसल्याचं दिसून आलं. तर धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील, यांना अजित पवार गटाची उमेदवारी देणे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना ऐनवेळी यवतमाळ-वाशिममधून शिंदे गटाकडून उमेदवारी देणे, महादेव जानकर यांना अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीतून लढविणे,

शिरूरमध्ये आढळराव पाटलांना शिंदे गटातून आणत घड्याळावर लढविणे, हे महायुतीचे प्रयोग सक्सेस होतील का ? ते पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुळात राज्यात झालेली दोन पक्षात फुट भाजपच्या पथ्यावर पडणार का ? असा संशय देखील निर्माण झालाय.