बीड : जमावबंदीचे आदेश डावलून बैठक घेणे भाजप आमदार सुरेश धस यांच्या अंगलट आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केलेले असतानाही त्यांनी ऊसतोड मुकादमांची बैठक घेतली होती.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने सुरेश धस यांच्यासह 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिरूर येथे मुकादमांची बैठक घेऊन साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असे स्पष्ट केले होते.
शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापूर्वी दोन वेळा सुरेश धस यांच्यावर जमावबंदी आदेश डावलल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश असताना आणि शिरुर शहरात कोरोनाचे रुग्ण आहेत हे महिती असतानाही उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.