मुंबई : अजित पवारांनी मुंबई, पुणे आणि बारातमी येथील कामाचे नियोजन कसे करावे? याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित दादांना सल्ला दिला आहे त्यांनी याचे वेळापत्रकही दिले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने राज्य पातळीवर सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे . पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या वतीने शनिवारी या सप्ताहाची सुरूवात झाली. दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करून उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील वक्तव्यावर भाष्य केले.
याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना वेळापत्रक सुचवले आहे ते म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या कामाचे नियोजन केले पाहिजे. सकाळी मुंबईत, दुपारी पुण्यात, त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये दौरा केला पाहिजे. आठवड्यातून एक दिवस पुण्यात येवून परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. त्यासाठी रोज शहरात भेट दिली पाहिजे. अधिकाऱ्यांवर धाक- दडपशाही करुन माणसं कामाला लागत नाही.लोकांना प्रेमाने बोलले पाहिजे. सकाळी ७ ते १ मुंबईत काम करावे, १ वाजता निघावे आणि १ ते ३ प्रवास करावा. ३ ते ५ पिंपरी-चिंचवडमध्ये काम करावे. त्यानंतर ५ ते ९ पुण्यात काम करुन रात्री १० वाजता पुन्हा मुंबईला जावे.
मुळात मुंबईमध्ये कामे आहेत काय…हेच मला कळत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांना लगावला आहे. त्यामुळे अजित पवार आता यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.