कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहेत.
आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला.
यावेळी महाराष्ट्राने केलेली कामगिरी मांडताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना बाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती दिली. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भिती तर अनेकांमध्ये काही ही होत नसल्याची लापरवाई आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबूरी देखील आहे अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान , ‘राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही.कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.