मुंबई – “आज मी तिथे नसलो तरी आपण सर्व एकत्र आहोत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यात घडलेल्या घटनेत मृत्यू झालेल्या बाळांच्या माता आणि नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
“आज मी येथे उपस्थित नसलो तरी, आपण सर्व एकत्र आहोत. भंडाऱ्यामध्ये जे घडले ते योग्य नाही. काल रात्री त्या घटनेबद्दल मला समजले. मी काल त्या भागात होतो”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.
“भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.