लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना व्हॉट्सअॅप वरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे चारच दिवस शिल्लक आहेत, अशा आशयाचा मेसेज व्हॉट्सअॅपवर आला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या 112 च्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. पुढील चार दिवसात माझं जे काही करायचं आहे ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना मी ठार मारणार आहे, असे या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेत सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलीस ज्या क्रमाकांवरून मेसेज आला त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
दरम्यान, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. गेल्यावर्षी देखील अशाच प्रकारे एका 15 वर्षीय मुलाने योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी मेसेजमधून दिली होती.