पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पेच अखेर सुटला आहे. आयएएस अधिकारी राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून राजेश देशमुख यांच्या नावाचा आग्रह धरला जात होता.आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.
कोण आहेत राजेश देशमुख ?
डॉ. देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदापासून शासकीय सेवेला प्रारंभ केला होता. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देशमुख यांनी काम केले. आयएसएस पदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची जबाबदारी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आलेख उंचावत गेला.
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी राजेश देशमुख सुरुवातीपासूनच सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. देशमुख हे मुंबईतील हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणूनही काम केलं आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारच पालकमंत्री असलेल्या या ‘कोरोनाग्रस्त’ जिल्ह्याचा कारभार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने उपाययोजना करण्यासाठी मर्यादा येत होत्या.