मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे अडचणीत आलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, आज अखेर नैतिक जबाबदारी स्वीकरून, स्वतःहून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. त्यामुळे राज्याची सत्ता हातात घेऊन ठाकरे सरकारला अडीच वर्षे होत नाहीत, तोवर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
आज ‘लेटरबॉम्ब’ प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात झाली. यामध्ये मुंबई हायकोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावली, तर अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना, आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. यासाठी सीबीआयला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, सीबीआयला या मुदतीमध्येच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.
दरम्यान, यावरून आता विरोधी पक्ष, सरकारवर तोंडसुख घेताना दिसत आहे. भाजपकडून या प्रकरणावर भाष्य करताना, प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकार टीका केली आहे. शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली आता राज्यातील महाआघाडी सरकारमधील किमान समान कार्यक्रम म्हणून, काँग्रेसला देखील तिसऱ्या विकेटसाठी संधी मिळायला हवी. काँग्रेसवर अन्याय होता कामा नये…असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत पुजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेचे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आज, गृहमंत्री अनिल देशमुखांना, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी टाकलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे राजीनामा द्यावा लागला आहे.
सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला लहिलेल्या पत्रात, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांद्वारे कमावण्याची सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे लिहिले होते.
शिवसेना झाल राष्ट्रवादी झाले आता राज्यातील महाआघाडी सरकारमधील किमान समान कार्यक्रम म्हणून काँग्रेसला देखील तिसऱ्या विकेटसाठी संधी मिळायला हवी. काँग्रेसवर अन्याय होता कामा नये…#AnilDeshmukh
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 5, 2021