IMPIMP

देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतलं रामललांचे दर्शन

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून ज्या राम मंदिराची प्रतिक्षा लागून राहिली होती. ती आता प्रत्यक्षात उतरली आहे. राम मंदिर पुर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक प्रभू श्रीराम लल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गर्दी करीत आहेत. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतले आहे.

अयोध्येत रामललांचे दर्शन घेतल्यानंतर रामजन्मभूमी न्यासाच्या पुस्तिकेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या संदेश पुस्तिकेत त्यांनी लिहिले की, “ज्या रामाच्या मंदिर पुननिर्माणात कारसेवक म्हणून सेवा देण्याची संधी मला मिळाली, त्याच मंदिराचे पुननिर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष रामललांचे दर्शन घेण्याची संधी सुद्धा मला मिळाली, हे माझे परमभाग्य आहे. मी रामललांचे खूप खूप आभार मानतो. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या या यज्ञात आहुती देणार्‍या सर्वांना मी नमन करतो. विशेषत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, या न्यासाचे सर्व विश्वस्त आणि मंदिर निर्माणातील विश्वकर्मांच्या दुतांना मी प्रणाम करतो.

अयोध्येतील राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाहेर त्यांनी बांधकाम कामगारांसोबत छायाचित्र सुद्धा काढून घेतले आणि महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेल्या बंधू, भगिनींच्या भेटीसुद्धा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांना पाहताच या मराठी बांधवांनी ‘400 पार-मोदी सरकार’ असे नारे दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत हनुमान गढी मंदिरात सुद्धा दर्शन घेतले.

राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राममंदिर नव्याने उभारल्यानंतर दर्शनाची प्रचंड ओढ होती. 3 वेळा कारसेवक आणि अनेकदा रामसेवक म्हणून अयोध्येत आलो. पण, आज रामाचे दर्शन घेतल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. देवाला काहीच मागायचे नसते, त्याला सारे काही ठावूक असते. आपल्या हयातीत राममंदिर होईल, हे ठावूक नव्हते. पण, मोदीजींचे आभार की हे मंदिरही झाले आणि त्याचे दर्शन घेण्याची संधीही मला मिळाली. आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नाहीत. आम्ही रामसेवक आहोत आणि रामाला मानतो सुद्धा.